Disclaimer - ब्लॉग लिहिताना कोणालाही कमी लेखण्याचा अथवा कोणाचे अनावश्यक महत्व वाढवून ठेवण्याचा मुळीच उद्देश नाही. केवळ, अत्यंत पारदर्शकपणे नाटकाकडे बघणे - त्यातील त्रुटींचा ( असतील तर ) विचार करणे - त्यावर सामोपचाराने चिंतन करणे - नाटकाच्या अधीक चांगल्या सादरीकरणासाठी काही विचार मांडणे व काही गोष्टी सुचवणे - हाच ह्या ब्लॉग लिहिण्यामागे उद्देश आहे.
माझे नाटकांबद्दलचे विचार आणि माननीय व आदरणीय परीक्षकांचे विचार यात मतांतराची शक्यता असू शकते. माननीय परीक्षकांचा ह्या क्षेत्रातील अनुभव माझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे यात मला तरी शंका नाही. त्यामुळे त्यांच्या परीक्षणाला समांतर परीक्षण पद्धती योजिण्याचा ह्या ब्लॉग च्या निर्मितीत मुळीच उद्देश नाही - याची कृपया नोंद घ्यावी.
ज्या नाटकांविषयी खरच मनापासून लिहावेसे वाटते त्याच नाटकांविषयी येथे लिहिले आहे. याचा अर्थ - ज्या नाटकांविषयी लिहिले नाहीये - त्यांची अंतिम फेरीत निवड होण्याची शक्यता कमी वगैरे आहे - असे मुळीच नाही. किंवा ज्या नाटकांविषयी लिहिलेले आहे ती १०० % नवात जातील असेही नाही. मुळात अंतिम फेरीचा विचार करून हे रसग्रहण केलेलेच नाही.
ह्या ब्लॉग वरील प्रत्येक पोस्ट च्या कमेंट मध्ये - नाटकावर चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे. कोणालाही हीन समजणे, अथवा हीन विधाने करणे कटाक्षाने टाळावे. शेवटी चर्चा-चर्वण , CONTROVERSIES आणि बाष्कळ विधाने मागे पडतात आणि केवळ नाटकच त्याच्या खऱ्या अस्तित्वासकट उरते. त्यामुळे नाटकाच्या अधीक refinement साठी मनापासून मते मांडूयात !
माझे नाटकांबद्दलचे विचार आणि माननीय व आदरणीय परीक्षकांचे विचार यात मतांतराची शक्यता असू शकते. माननीय परीक्षकांचा ह्या क्षेत्रातील अनुभव माझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे यात मला तरी शंका नाही. त्यामुळे त्यांच्या परीक्षणाला समांतर परीक्षण पद्धती योजिण्याचा ह्या ब्लॉग च्या निर्मितीत मुळीच उद्देश नाही - याची कृपया नोंद घ्यावी.
ज्या नाटकांविषयी खरच मनापासून लिहावेसे वाटते त्याच नाटकांविषयी येथे लिहिले आहे. याचा अर्थ - ज्या नाटकांविषयी लिहिले नाहीये - त्यांची अंतिम फेरीत निवड होण्याची शक्यता कमी वगैरे आहे - असे मुळीच नाही. किंवा ज्या नाटकांविषयी लिहिलेले आहे ती १०० % नवात जातील असेही नाही. मुळात अंतिम फेरीचा विचार करून हे रसग्रहण केलेलेच नाही.
ह्या ब्लॉग वरील प्रत्येक पोस्ट च्या कमेंट मध्ये - नाटकावर चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे. कोणालाही हीन समजणे, अथवा हीन विधाने करणे कटाक्षाने टाळावे. शेवटी चर्चा-चर्वण , CONTROVERSIES आणि बाष्कळ विधाने मागे पडतात आणि केवळ नाटकच त्याच्या खऱ्या अस्तित्वासकट उरते. त्यामुळे नाटकाच्या अधीक refinement साठी मनापासून मते मांडूयात !
धन्यवाद ! :-)
**************************************************************************************************************************
नेपथ्य - साजेसे ! अंग्री बर्ड्स च्या बाहुल्यांना धुण्याच्या दोरीवर टांगण्याचे प्रयोजन छान ! स्टेज वर फक्त न्हाणीघर व त्यातल्या वस्तू ( डाव्या बाजूस ) - मध्यभागी पुरुष पात्राचा घरातला वावर - उजवीकडे उच्चस्थानी स्त्री पात्राची एन्ट्री . एकुणात नेपथ्यात केलेला चांगला विचार जाणवत होता.
प्रकाशयोजना - नेपथ्यास पूरक ! वेगवेगळ्या रंगांचा सूचक वापर. वेगवेगळ्या स्पेसेस - प्रकाशयोजनेतून निर्माण करण्यात यश.
अभिनय - दोनीही कलाकार उत्तम अभिनय करू शकतात याची चुणूक दाखवण्यात पूर्णपणे यशस्वी !
पार्श्वसंगीत - काहीच ठिकाणी खूप मोठ्या आवाजात ऐकू आल्याने काही संवाद नीट ऐकू आले नाहीत. पण एकुणात साजेसे !
दिग्दर्शन - प्राप्त संहितेस , अधिक उच्चस्थानी नेण्यात दिग्दर्शनाचा मोलाचा वाटा ! दिग्दर्शकाने त्याचे काम चोख केले आहे असे वाटते. न्हाणीघरात पुरुष पात्राचे कपड्यांचे पिळून काढणे - त्याच्या मनो अवस्थेला समर्पक.
लेखन - टीम मध्ये एवढे सगळे प्लस पोईणट्स असताना प्रेक्षकांपासून नाटक एवढे दूर का राहिले याचे कारण लेखनात आहे का, याचा विचार केला पाहिजे. ( या ठिकाणी मी मुळीच सर हिमांशू वझेंच्या लेखनावर टीका वगैरे करत नाहीये. त्यांचा लेखनातला अनुभव चांगलाच आहे. हे फक्त काही विचार आहेत - जे माझ्या आत्ताच्या माफक जाणीवां पर्यंत मर्यादित आहे. चुकत असल्यास माफ करावे )
माझ्या मते - नाटक पात्रांच्या एकमेकांशी फक्त वागण्या-बोलण्या पर्यंतच राहिले. त्यांच्या एकमेकांशी तश्याप्रकारे वागण्या-बोलण्याची अपरिहार्यता नक्की काय आहे - हे खोलात शिरून मांडले गेले नाही. जोपर्यंत मला प्रेक्षक म्हणून त्याची अपरिहार्यता समजत नाही - तोपर्यंत प्रेक्षक त्यांच्या संघर्षाशी एकरूप होऊ शकत नाही. दोन्ही पात्रांच्या वयातील फरक - आणि पर्यायाने त्यांच्यात निर्माण होणाऱ्या सहजीवनातील विसंगती - ही कारणे - त्या अपरिहार्यतेस पुरेशी आहेत - हे पटत नाही. जोडप्यातील दोघांचा - एकाच क्षेत्रातील व्यवसाय असल्याने - त्यांच्यात इगो प्रोब्लेम्स निर्माण होणे साहजिकच आहे - पण हेही कारण ती अपरिहार्यता सिद्ध करण्यास पुरेसे आहे हे पटू शकत नाही. नाटकातले पुरुष पात्र - एवढ्या दडपणास शरण का जाते आहे - याचेही कारण समजत नाही. लेखनात वापरलेली भाषाशैली वरकरणी चुरचुरीत , भावचमत्कृतीपूर्ण , बुद्धीचातुर्यपूर्ण आणि प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर सहजपणे हसू उमटवणारी असली ( ही शैली फारच कमी लेखकांना अवगत असते आणि खूपच भुरळ पाडणारी आहे ) - तरी मुळात वर उल्लेखलेले प्रश्न अनुत्तरीतच राहिल्याने ती तेवढ्यापुरतीच आनंद देणारी ठरते. नाटकातली पात्रे 'Angry birds' का झालीयेत - एकमेकांबाबतची त्यांची विधाने आणि दृष्टी एवढी कलुषित का झाली आहे - याची कारणे शेवटपर्यंत समोर येत नाहीत. त्यामुळे मुख्य पुरुष पात्राच्या पिळवटून टाकणाऱ्या दुख्खाशी प्रेक्षक कधीच एकरूप होऊ शकत नाही - आणि मग प्रेक्षकाच्या रोजच्या जगण्यापासून नाटकातल्या पात्रांचा संघर्ष खूप दूर राहतो असे वाटते ! आणि मग शेजारच्या घरातल्या जोडप्याची भांडणे चवीने ऐकणाऱ्या आणि डोकावून बघणाऱ्या चाबरट बघ्यासारखी - प्रेक्षक म्हणून - नाटक बघताना माझी अवस्था होते.
पण तरीही फर्गुसन च्या नाटक करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि कौतुक करावेसे वाटते. आपल्या वयाहून मोठ्या असलेल्या पात्रांच्या प्रोब्लेम्स चा विचार करून - तो समजून घेऊन - त्या जाणीवां पर्यंत पोहोचावेसे वाटणे हेच कौतुकास्पद आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Sinhagad College of Architecture - पत्त्याचे घर !
मागील वर्षी याच महाविद्यालयाने पदार्पणातच एक चांगले नाटक सादर केले होते. या वर्षी मागील वर्षीपेक्षा चांगले नाटक त्यांनी सादर केले यात शंका नाही.
कथेतले वेगळेपण ( वरकरणी प्रत्येक कथा इतर कोणत्याही कथेपेक्षा वेगळी असते - आणि त्या अर्थी प्रत्येक कथेच वेगळेपण असतं. पण तरीही बऱ्याच कथा साचेबद्ध असतात. ही कथा साचेबद्ध नव्हती या अर्थी तिचे वेगळेपण ) , नाटकातले बरेचसे प्रसंग कोणत्याही संवादांचा भडीमार न करता असणे आणि नाटकातल्या पात्रांबाबत खरच मनापासून वाईट वाटणे - ही प्रामुख्याने ह्या नाटकाची वैशिष्ट्ये !
नेपथ्य - फारसे दोष काढण्यासारखे नव्हते. नेपथ्याचा संपूर्ण वापर कलाकारांनी केला. खिडकी , गेलरी यांचा काही प्रसंगांत सुंदर वापर केला होता. एकुणात नेपथ्यात विचार जाणवत होता. फक्त रंगसंगती थोडी अजून चांगली केली जाऊ शकते. रंगसंगतीचा विचार करताना - नाटकातल्या पात्रांच्या मनाच्या अवस्थेचा खोलात विचार केला जावा असे वाटते.
लेखन - बऱ्यापैकी सुसंबंद्ध ! पण काही प्रसंगांत - पात्रांच्या पेक्षा लेखक डोकावत होता असे वाटले. उदाहरणार्थ - नाटकातल्या गड्याचे ( डोक्याने थोडा कमी असलेले मुलीच्या मित्राचे पात्र - मला नाव आठवत नाहीये ) तोंडी - यमक असलेले संवाद ! लेखकाची काही टाळ्यांची वाक्ये असतात - जी वाक्ये म्हणून लोभसवाणी व सुंदर असतात - पण नाटकातली पात्रे तशी वाक्ये बोलतील काय - आणि ती जर तशी वाक्ये बोलू लागली - तर त्यांनाही लेखका इतुकेच डोके , जाणीवा व बुद्धी आहे काय - असे प्रश्न पडतात ! बऱ्याच वेळा नाटक लिहिताना ही चूक घडते असे वाटते. नाटकातली पात्रे त्यांच्या सहज-स्वभावानुसार वागली - बोलली पाहिजेत. आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा की - मुळातच शारीरिक व्यंग - किंवा मानसिक व्यंग असणाऱ्या पात्रांनी स्वताहून सहानुभूती खेचण्याचा प्रयत्न केला - तर त्यांच्याबाबतीत जी सहानुभूती सहज्भावानेने वाटू शकते तीही कदाचित वाटेनाशी होते. नाटकातली दोन्ही पात्रे - अधून मधून ही सहानुभूती स्वताहून खेचायचा प्रयत्न करतात. असे का होत असेल - याचा विचार केल्यास - त्याचे उत्तर लेखकाच्या विचारांमध्ये सापडू शकते. मुळातच लेखकाने असे व्यंग असलेले पात्र योजण्याचा निर्णय घेतल्यावर - सहजच त्या पात्राला सहानुभूती - कीव मिळायला हवी अशी त्याची धारणा होते ! आणि मग नकळत त्याला ती सहानुभूती मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्या मते इथेच ते पात्र थोडे कृत्रीम बनते. पात्रे फक्त इतर पात्रांबरोबर त्यांच्या सहज स्वभावाने वागली पाहिजेत - लेखकाचा हस्तक्षेप त्यात फारसा नको ! ( कृपया लेखकाने ही टीका समजू नये - ही फक्त मते आहेत - टीका नव्हे ) ह्या नाटकाचा आलेख चढता ठेवण्यात मात्र लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे यात शंकाच नाही. 'पत्त्यांचे घर' हे नाव सुचणे देखील लेखकाच्या क्षमतेची जाणीव करून देते.
अभिनय - सुरुवातीला 'मुलीचा' अभिनय थोडा भडक होतोय की काय असे वाटत होते - पण तिने जे बेअरिंग पकडले होते ते शेवटपर्यंत सोडले नाही - आणि सिद्ध केले की ती जे सुरुवातीपासून करत होती तेच योग्य आहे. मुलीचा अभिनय त्यामुळे कौतुकास पात्र ! मुलाचा अभिनय मात्र काही ठिकाणी खटकतो - मुलाने आपल्याकडून काही ठिकाणी विनोद झालाच पाहिजे - अशी धारणा करून बसू नये. विनोद तितका उत्तम असेल तर तिथे प्रेक्षकांना मनापासून हसू येणारच आहे - त्यासाठी वेगळा आटापिटा करण्याची जरुरी नाही असे वाटते. तसेच त्याने स्वताहून सहानुभूती घेऊ नये. मुलाचा अभिनय अजून नैसर्गिक होऊ शकतो. भावाने व त्याच्या इतर मित्रांनी मात्र - अभिनयात अजून कष्ट घेणे गरजेचे आहे. पण गेल्या वर्षीपेक्षा - ह्या वर्षीचा अभिनय सरस वाटतो !
नाटक काहीसे भाबडे आहे. नाटकाची ताकद लेखनापेक्षा त्यातल्या पात्रांच्या संघर्षात आणि त्यांच्या एकमेकांबरोबराच्या वागण्यात आहे असे मला वाटते. त्यामुळेच की काय मधले काही प्रसंग - ज्यात संवाद शून्य आहेत पण घडणेच खूप भावपूर्ण आहे - ते जास्त परिणामकारक होतात. नाटकाच्या शेवटी व्होईस ओव्हर मध्ये येणारा मेसेज - नाटकातल्या घडण्यातून पूर्णपणे येत असेल तर शेवटच्या स्पून फीडिंग ची गरज वाटत नाही.
अंतिम फेरीत नाटकाने प्रवेश केल्यास - खूप Improvement ची गरज आहे ! शुभेच्छा ! :-)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Pune Jilha Shikshan Mandal – ‘Night of Sherwarsa’
गेल्या वर्षी ह्या महाविद्यालयाने '१९५९ सालचा सिनेमा' हि एकांकिका सादर केली होती व ती तिच्या सादरीकरणातील वेगळेपणामुळे गाजली होती. याही वर्षी ह्या महाविद्यालयाने एक हलकी-फुलकी , सुंदर एकांकिका सादर केली. सर्वच प्रेक्षकांनी एकांकिकेचा मनसोक्त आनंद लुटला. कथा साधारण पुढीलप्रमाणे.
एका सध्या गावातील साध्या मुलामुलीची ही प्रेमकहाणी. दोघांचे प्रेम जमते. आणि मग भारावलेली दोन्ही मने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. रात्रीच्या वेळी मुलगी घरातून पळून आलेली असते आणि मुलाची वाट बघत असते. मित्रांनी दोघांना पळून जाण्यासाठी सायकलीची व्यवस्था चोख केलेली असते पण डबल सीट म्हणून त्या सायकल ला मागे कॅरियर नसते. मग 'ती' सायकल च्या पुढच्या भागात बसते आणि दोघांचा मुसळधार पावसातला पुढचा प्रवास सुरु होतो. मग प्रवासातल्या गमती-जमती घडतात. स्वप्नरंजनाचे काही प्रसंग घडतात. शेवटी दमल्यावर दोघेही एका अनोळखी झोपडीत शरण घेतात जिथे एक आजी-आजोबा रहात असतात. ते त्यांना चहा करून देतात. शेवटी निघताना - ते आजी-आजोबांकडे मागे वळून बघतात आणि त्यांना त्यांच्या आई-वडिलांची आठवण होते. मग दोघेही परत घरी जाण्याचा निर्णय घेतात आणि परतीच्या वाटेला निघतात. शेवटी मोठे झाल्यावर - दोघांचाही रीतसर पाहण्याचा कार्यक्रम होतो आणि कथा संपते.
नाटकाची पटकथा अगदी साधी पण ह्या मुलांनी फारच भन्नाट पद्धतीने ती सादर केली. नेपथ्य आणि प्रकाशयोजना अत्यंत सफायीदार ! मोजके ! नेपथ्याच्या हालचाली अत्यंत वेगवान ! नाटकाला प्रचंड वेग होता. एकांकिका कुठेही उगाचच रेंगाळली नाही किंवा रटाळ झाली नाही. दहावीतल्या मुलांचे भावविश्व इतक्या सुंदरपणे रेखाटले होते की प्रेक्षकही त्या सर्व घडण्याच्या प्रेमात पडावे ! मुळात - नाटकाच्या टीकाकारांच्या लेखी अत्यंत महत्वाचा ठरणारा ' internal conflict ' इथे फारसा महत्वाचा नव्हताच ! त्यामुळे अपेक्षित 'फील' निर्माण करण्यात नाटक यशस्वी झाले असे म्हणायला हरकत नाही !
खूप दिवसांनी इतक्या साध्या विचारांची - हलकी फुलकी एकांकिका पहावयास मिळाली. जगणं खरोखर लोभसवाणं करून टाकणारी ! नाटक फायनल मध्ये गेल्यास शुभेच्छा ! :-)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Tikaraam Jagannath Mahavidyalay - Identity
प्रस्थापित महाविद्यालयांच्या गर्दीत - स्पर्धेच्या दृष्टीने एखाद्या नवख्या कोलेज ने चांगले नाटक सादर करायचा प्रांजळ प्रयत्न केला की खूप चांगले वाटते - हाच अनुभव टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे 'Identity ' नाटक बघून आला.
विषय - बाह्यांगी पुरुष असलेल्या स्त्री-मनाच्या व्यक्तीची घुसमट !
नेपथ्य - विषय आणि मांडणीस साजेसे असेच. आरसा नसताना आरशाच्या चांगला वापर केला होता. केवळ आरशाच्या दोन बाजूस समांतर ठेवलेल्या वस्तूंमुळे आरसा उत्तमरीत्या साकार झाला. नेपथ्यातील कोणताही भाग अनावश्यक वाटला नाही हे विशेष. वरकरणी हि गोष्ट साधी वाटली तरीही एखाद्या नवख्या कोलेज च्या मुलांनी नाटक सादर करताना ह्याचे ठेवलेले भान कौतुकास पात्र !
पार्श्वसंगीत - पार्श्वसंगीताचा अतीरिक्त वापर झाला असे वाटले. नाटकातले काही क्षण - शांततेत गेले असते तर अधिक परिणाम साधला गेला असता असे वाटते. पार्श्वसंगीताच्या अधिक वापरणे अश्या नाजूक क्षणांना खूप धक्का पोहोचत होता. सुरुवातीचे 'स्वर' च्या पात्राचे आरशासमोर येऊन उभे राहणे आणि स्वतःला न्याहाळणे खूप जास्त वेळ घडले - आणि सततच्या पार्श्वसंगीतामुळे ते मोनोटोनस झाले.
अभिनय - 'स्वर' ने चांगला अभिनय केला - पण तो अजून चांगला होऊ शकतो. मला स्वतःला त्याच्या काही शब्दोच्चारांचे वावगे वाटले नाही. उदाहरणार्थ - नुसकान वगैरे ! आपल्या समाजात अशाप्रकारे बोलणारी माणसे आहेत - त्यामुळे त्याच्या तश्या बोलण्याला आपण नाकारू शकत नाही. लेखकाच्या पात्राचेही काम ठीक - पण काही ठिकाणी तो खूपच जास्त आरडा ओरड करतोय असे वाटले. तिसऱ्या मुलाने मात्र काळजीपूर्वक सुधारणा करणे गरजेचे वाटते. 'स्वर' ने काम करताना - कुठेही हास्यास्पद वाटले नाही - हे वाखाणण्याजोगे. काही ठिकाणी - प्रेक्षकातले काही लोक हसले - पण बारकाईने विचार केल्यास ते स्वतःवरच हसत होते - असे वाटते.
नाटकाची मांडणी अजून समंजसपणे होउ शकते. 'स्वर' च्या पात्राची घुसमट होते आहे - हे एकदा कळल्यानंतर - तोच मुद्दा या न त्या मार्गे पुन्हा पुन्हा सांगितला जात होता. त्यामुळे त्याचे स्त्री होण्याच्या निर्णयावर परिणाम करू शकणाऱ्या इतर घटकांविषयी 'घडण्यातून' फारसा प्रकाश टाकायला वेळच शिल्लक उरला नाही. परिणामी नाटक पुढेच सरकले नाही ! नाटकाचा विषय नाजूक होता - पण त्याची मांडणी थोडी भडक , वरवर आणि बाह्यांगी झाली असे वाटले. 'स्वर' च्या आतली स्त्रीच शेवटी त्याला आधार आणि बळ देते - हे दाखवण्यासाठी केलेला एक स्त्री पात्राचा मोजकाच वापर मात्र उत्तम ! इतर कुठूनही आशेचा किरण दिसत नसताना - त्याच्यातली स्त्री सर्व इतर गोष्टींना झुगारते आणि मुक्त होते - हा नाटकाचा शेवट !
एका चांगल्या प्रयत्नासाठी टिकाराम जगन्नाथ च्या सर्व स्पर्धक मित्रांचे अभिनंदन !
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संयत अभिनय , संयत मांडणी , मोजकेच नेपथ्य , गरजेपुरतीच प्रकाशयोजना , सुयोग्य पार्श्वसंगीत ह्या नाटकाच्या जमेच्या बाजू ! गेल्या वर्षी ह्या महाविद्यालयाने 'सावल्या' नावाचे नाटक केले होते. ह्या वर्षी , नाटकाच्या सादरीकरणाच्या दृष्टीने - सर्वच बाबतीत झालेली प्रगती दाद देण्याजोगी.
१) नेपथ्य - वर उल्लेख केल्याप्रमाणे मोजके जरी असले तरीही त्याची मध्ये मध्ये होणारी हालचाल अनावश्यक आणि पूर्णपणे टाळता येण्याजोगी आहे असे वाटते. आधीच जवळ-जवळ सगळेच blackouts टाळण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे, तर मग इतरही हालचाली टाळता येऊ शकतात का याचा विचार होणे गरजेचे आहे असे वाटते.
२) नाट्यरूपांतर - कथेचे 'नाट्य रुपांतर' करताना त्यातल्या 'नाट्याला' प्राधान्य दिले पाहिजे. प्रथमपुरुषी एकवचनी निवेदन शैली कमीत कमी वापरता आली - तर 'नाट्य' सादरीकरणास अधिक वेळ मिळेल. नाट्याची सर्वंकष अनुभूती मिळाली तर वर्णनात्मक शैलीचा वापर कमी करता येईल. माझ्या मते आपण कथेकडे कसे बघतो ह्यावर हे अवलंबून आहे. उदाहरणार्थ - समजा कथेची सुरुवात प्रथमपुरुषी एकवचनी निवेदन शैलीतून झाली असेल ( म्हणजे - " मी पत्र लिहायला घेतले आणि अनेक गोष्टी मला आठवल्या ..." ) तर वाचकाने त्याचे नाट्य रुपांतर करतानाच - कुणी त्रयस्थ माणसाच्या बाबतीत हे सर्व घडले आहे - अशा नजरेतून बघितले - तर नकळतच - कथावस्तुतले 'घडणे' महत्वाचे ठरते आणि 'नाट्य' जास्त परिणामकारक पणे प्रेक्षकांसमोर मांडता येते. ( अर्थात दर वेळी हे शक्य होईलच असे नाही - किंवा असे केले तरच ते 'matured expression ' असते असेही नाही. ) मुलीचे लेखकाला भेटण्याचा प्रसंग उभ्या उभ्याने होत आहे. ह्या प्रसंगाच्या घडण्यातच मुळात प्रचंड उत्कट नाट्य आहे. शाब्दिक चर्चा न करत बसता - नजरेतून, pauses मधून , देहबोलीतून आणि अधिक परिणामकारक संवादातून सर्वच प्रसंग अधिक खुलवता येतील. कथेचे नाट्य रुपांतर करताना - मोजक्या आणि नेमक्या संवादांचीच गरज असते. बाकी सर्व, न बोलता पात्रांच्या देहबोलीतून पोहोचू शकते !
३) अभिनय - बऱ्यापैकी चांगला केला आहे. पण अजून तो बराच नैसर्गिक होऊ शकतो असे वाटते. स्पर्धांमध्ये नाटक करताना बऱ्याच वेळा आपल्याकडे 'acting templates ' उपलब्ध असतात. उदाहरणार्थ - रडण्याचा अभिनय , रागाचा अभिनय , भावना-विवश होण्याचा अभिनय - इत्यादी अनेक 'TEMPLATES' ! ह्या सर्व आपणापर्यंत सिरिअल्स मधून पोहोचत असतात. नकळत आपण त्या follow करतो. पण असे केल्याने - नाटकातल्या पात्रांच्या - स्वतःच्या अश्या लकबी असू शकतात, त्यांची नजर व बोलण्याची-चालण्याची पध्धत वेगळी असू शकते - ह्याचा विचार केला जात नाही आणि त्याच मुळे त्याचा परिणाम हवा तेवढा होत नाही. ( याचा अर्थ दर वेळी अश्या लकबींचा वापर झालाच पाहिजे - तरच उत्तम अभिनय असतो असे नाही - पण असे काही असू शकते का - ह्याचा विचार मात्र केला पाहिजे. ) नाटकातल्या मुलीला स्वतःच्या दिसण्याविषयी असलेला कमालीचा न्यूनगंड - अभिनयासाठी खूप possibilities निर्माण करतो असे वाटते ! हीच बाब लेखकासाठी सुद्धा लागू पडते.
एकुणात - एक चांगले नाटक जे अजून खूप अधिक चांगले होऊ शकते !
अभिनंदन !
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Cummins College of Engineering - बागुलबुवा.
नाटक उत्तम सादर केले त्याबद्दल मनापासून अभिनंदन. संयत मांडणी - आणि कथावस्तुशी राखलेला सच्चेपणा दाद देण्याजोगाच. नाटकाचे नावही कथेतल्या पात्रांच्या मनोव्यारांना साजेसे असेच. 'दिग्दर्शन' करायचे, म्हणून मुद्दाम समांतर वाटांचा हट्टाने शोध घेणे टाळले - हे सर्वात उत्तम. एकंदरीत ह्या वर्षीच्या पुरुषोत्तम मध्ये, सुरुवात झाल्यापासून बऱ्याच दिवसांनी खात्रीने नवात प्रवेश करू शकेल अशी एकांकिका दिल्याबद्दल मुलींचे मनापासून अभिनंदन ! :-)
काही गोष्टी सुचवाव्याश्या वाटतात - त्या पुढील प्रमाणे .
१) नेपथ्य - नेपथ्याची सततची हालचाल गरजेची वाटत नाही. नाटकात तीन स्थाने महत्वाची वाटतात. प्रीन्सिपाल चे ऑफिस , तळ्याच्या काठचा परिसर आणि मुलींचे विश्व ! यात मुलींचे विश्व - इतर दोन जागांच्या मध्ये घुसमटले गेले आहे - कोंदाटले गेले आहे म्हणून ते मध्यस्थानी योग्य वाटते. एकदा हि तीन स्थाने पक्की केली - तर त्यांची सततची हालचाल करण्याची गरज नाही. त्यामुळे नाटकात होणारे खूप सारे blackouts टाळता येतील. इतर एक-दोन प्रसंग जे ह्या तीन स्थानांपेक्षा वेगळ्या ठिकाणी घडतात ते पहिल्या विन्गेच्या पट्ट्यात घडवता येतील.
२) अभिनय - उर्मी व छोट्या मुलींचा अभिनय उत्तम. इतर वयाने मोठ्या असलेल्या बायकांचा अभिनय अजून जास्त - त्यांच्या वयाला साजेसा असा असावा असे वाटते.
३) नाटकाबद्दल थोडे - Robert Mckee says - " Never give your protagonist an easy way out ! " चांगल्या नाटकात प्रेक्षकांचा प्रवास सुद्धा नाटकातल्या पात्रांबरोबर होत असतो. अशा वेळी - नाटकातल्या झगड्याशी प्रेक्षकांनीही दोन हात केलेले असतात ! बागुलबुवा नाटकात हा झगडा खूपच सोप्प्या पद्धतीने संपतो - त्यामुळे अपेक्षित climax गाठण्यात नाटक थोडे कमी पडतेय असे वाटते. ' म्हणूनच त्याला बागुलबुवा म्हटले आहे ' - हे जरी खरे असले तरी - इतक्या नाजूक विषयाच्या मांडणी मध्ये ते समर्थनीय वाटत नाही. ' केवळ एकदा ठामपणे नाही म्हणण्याची गरज असते ' हे जरी खरे असले तरी दुर्दैवाने तसे क्वचितच घडते - आणि हाच बागुलबुवा - परिस्थितीला भीषण करून टाकतो.
मुलीची आई मुलीच्या बाबतीत नंतरच्या अर्ध्या भागात खूपच insensitive वाटते. काही पालक त्यांच्या मुलांच्या बाबतीत थोडे निष्काळजी आहेत हे एक वेळ मान्य केले तरीही - आपल्या मुलीच्या बाबतीत कोणत्या तरी प्रकारचे लैंगिक शोषण होत आहे हे कळल्यावर - कोणत्याही आई ची प्रतिक्रिया इतकी निष्काळजी अथवा दुर्लक्षित असू शकेल ह्यावर विश्वास बसत नाही.
नाटकातले 'उर्मी' चे पात्र - सर्व माहित असूनही - परिस्थितीला वयाने मोठे झाल्यावरही - इतके शरण का जात आहे - याचे 'पटू शकेल असे' कारण - आत्ता तरी मिळत नाहीये. लहानपणी एवढे सहन करूनही उर्मी केवळ उपजीविकेसाठी आत्याच्या शाळेत काम करते आहे - हे पचवायला बऱ्यापैकी अवघड जात आहे. तिला principal चा असलेला धाक - व तिच्याकडून मिळणाऱ्या धमक्या - तिला इतके शरण जाण्यासाठी - पुरेशा वाटत नाहीत.
आपली समस्या गोष्टीरुपी पात्रांच्या माध्यमातून पोचवण्याचा छोट्या मुलीचा प्रयत्न थोडा - पटत नाही. मुळात अश्या प्रकारच्या समस्येतून व त्रासातून जाणाऱ्या मुलांचे भावविश्व पूर्णपणे बदलून जाते. त्यांच्याही नकळत ते त्यांच्या बाल्य विश्वातून बाहेर येतात. The children just come out of their cartoon or comic stories - and that's the brutal reality of this issue. That's the tremendous amount of pain. The shocking loss of innocent believes is at the core of such issues .
एकंदरीत नाटक खऱ्या-खुऱ्या कौतुकास नक्कीच पात्र आहे. पुन्हा एकदा अभिनंदन ! :-)